Maratha Reservation Manoj Jarange Patil: आधी आम्हाला ओबीसीमध्ये घ्या, आरक्षण मिळवून राहणार, असे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
Maratha Reservation Manoj Jarange Patil: ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. मराठा समाजाला राजकीय आरक्षणही मिळायला हवे. कोणी भेटायला आले किंवा आले नाही तरी आमचे काम सुरूच आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण दिले नाही, तर ओबीसी नेत्यांची नावे जाहीर करू, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला असून, आजचा दिवस वाढवून देण्याची मागणी केली आहे. उद्या १०० टक्के शिष्टमंडळ येणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. जर आले नाही तर यावर उद्या थेट बोलणार आहे. आम्ही आमची तयारी केली आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना, कोणी भेटायला आले किंवा नाही आले तरीही आमचे काम सुरु आहे. आम्ही कामाला लागलो असून, आरक्षण मिळवून राहणार आहे. भेटायला यावे किंवा नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
२४ डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर…
आमच्याकडे पुरावे आहेत. ओबीसी बांधवांच्या मनात काहीही नाही. आत्तापर्यंत ४० वर्षे मराठा बांधवांचे नुकसान झाले आहे. आता ओबीसी लोकांना हे कळले आहे. गावागावांत हे परिवर्तन झाले आहे. आमचे आरक्षण आम्हाला दिले जाते आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारचे म्हणणे योग्य आहे, असे सांगत, २४ डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर ओबीसी नेत्यांची नावे जाहीर करणार आहोत. कोण कोण ओबीसीमध्ये २० वर्षांपासून आहेत आणि आपले आरक्षण कुणी दिले ती नावे जाहीर करणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, जे विरोध करत आहेत त्यांनी सांगावे की नेमका विरोध कशासाठी? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली. तसेच बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवून ७५ टक्के करण्यात आली आहे. यावर, आधी आम्हाला ओबीसीमध्ये घ्या, मग आरक्षणाची मर्यादा वाढवली तरी आमची हरकत नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.