Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार यात काहीच शंका नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal:
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते आक्रमकपणे भूमिका मांडत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे. यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सदनातील घोटाळ्यावरून छगन भुजबळांवर टीका केली.
कुठे भाजी विकत होते, कोणाच्या इथे काय करत होते, मुंबईला काय केले, कोणत्या नाटकात काम केले, कोणत्या पिक्चरमध्ये काम केले हे सगळे मला माहिती आहे. कुणाचा बंगला हडप केला, हेही मला माहिती आहे. मी म्हटले की, तुम्ही मराठी जनतेचे खाल्ले, महाराष्ट्र सदनातील पैसा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. तो पैसा खाल्ला आणि त्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेचा तळतळाट लागला. तुरुंगात गेले आणि बेसण भाकर खाल्ली, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.
मराठा एकवटला आहे, पण गर्दीच्या नादात अतिउत्साहात येऊ नका
सभेला संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाज प्रचंड संख्येने जमला त्यासाठी मनापासून कौतूक. मात्र, या गर्दीच्या नादात आपल्या हातून काही चूकही व्हायला नको. मराठा एकवटला आहे, पण गर्दीच्या नादात अतिउत्साहात येऊ नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पुन्हा समाजाची हानी होईल. आता समाजाची हानी होऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
दरम्यान, आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. २४ डिसेंबरच्या आतमध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार यात काहीच शंका नाही. मराठ्यांच्या ओबीसीत ३२ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांचा गुणाकार केला, तर दीड ते पावणे दोन कोटी मराठा लोकांना लाभ होतोय. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी दिले असते, तर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात नंबर एकची प्रगत जात ठरली असते, असे मनोज जरांगे म्हणाले.