जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे पोलिसांना आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचा आरोप झाला. त्यावर फडणवीसांनी भाष्य केलं.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यात अनेक आंदोलक जखमी झाले. यात महिला आंदोलकांचाही समावेश होता. यानंतर राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले. यावेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचाही आरोप झाला. मात्र, आता एका माहिती अधिकार अर्जातून समोर आलेल्या माहितीनुसार ते लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले नव्हते, असं समोर आलं आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी (२० नोव्हेंबर) माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी यापूर्वीही हे सांगितलं आहे की, अशाप्रकारचा बळाचा वापर करायचा असेल, लाठीचार्ज करायचा असेल, तर त्या ठिकाणचे पोलीस प्रमुख परिस्थिती पाहून निर्णय घेतात.”
“जे सत्य आहे तेच बाहेर आलं आहे”
“स्थानिक पोलीस अधिकारी गृहमंत्र्यांना विचारून किंवा पोलीस महासंचालकांना विचारून लाठीचार्जचा निर्णय घेत नाहीत. त्यामुळे माहिती अधिकारातून जी माहिती समोर आली त्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. जे सत्य आहे तेच बाहेर आलं आहे,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.
“राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसते”
चंद्रशेखर बावनकुळेंच्या व्हायरल फोटोवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं.”
“पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे…”
“संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे बावनकुळे, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. इतकी निराशा योग्य नाही,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं.
“हे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे”
“व्यक्तिगतपणे लक्ष्य केलं जात आहे यापेक्षा खालची पातळी काय असू शकते. ते असे मॉर्फ केलेले फोटो, कापलेले फोटो पोस्ट करून वाईट आरोप करत आहेत. हे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे,” अशी टीकाही फडणवीसांनी केली.